⚡दोडामार्ग ता.२८-: दोडामार्ग ते तिलारी मार्गावरील घाटमाथ्यावरून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा गोवा–दोडामार्ग चेकपोस्टदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एका कारमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी प्रसाद शंकर गुणाजी (वय ३०, रा. लक्ष्मी गल्ली, हलगा, व्ही.टी.सी., ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कारची झडती घेतली असता एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये रोख रक्कम रुपये २६,८८०/- आढळली. तसेच गोवा बनावटीच्या DSP Black Deluxe Whisky (१८० मि.ली.) च्या ४८ बाटल्यांचे प्रत्येकी तीन बॉक्स (एकूण १४४ बाटल्या) आणि चौथ्या बॉक्समध्ये २४ बाटल्या अशा एकूण १६८ बाटल्या सापडल्या. प्रत्येकी १६० रुपये प्रमाणे या दारूची किंमत सुमारे २,२५,००० रुपये इतकी आहे.
याशिवाय सिल्व्हर रंगाची मारुती सुझुकी अल्टो LXI (क्रमांक MH 31 EK 7216) ही कारही जप्त करण्यात आली आहे. एकूण २,५१,८८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस मोहन मळगावकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारूसह कार जप्त; एकाला अटक..
