Headlines

ओसरगाव टोल नाक्याविरोधात सिंधुदुर्गात पुन्हा रणशिंग…

टोलमाफी द्या किंवा पर्यायी राज्य मार्ग द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा..

कणकवली : ओसरगाव येथील टोल नाका मे महिन्यापासून कार्यान्वित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि टोल मुक्त कृती समितीने पुन्हा एकदा टोलविरोधी भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोलमाफी द्यावी किंवा ओसरगाव येथे पर्यायी राज्य मार्ग तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात व्यापारी महासंघ आणि टोल मुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, टोल विरोधी कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, चंद्रकांत उर्फ राजू जठार, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, अॅड. नितीन म्हापणकर, विनायक मेस्त्री, मनोज वालावलकर आदी उपस्थित होते.

यापूर्वी तीनदा प्रयत्न हाणून पाडले

ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी तीन वेळा टोल वसुलीचे प्रयत्न झाले होते. वेगवेगळ्या एजन्सींमार्फत हे प्रयत्न करण्यात आले. मात्र व्यापारी महासंघ, टोल मुक्त कृती समिती आणि जिल्हावासीयांच्या तीव्र आंदोलनामुळे टोल वसुली सुरू होऊ शकली नव्हती, अशी माहिती संजय सावंत यांनी दिली.

टोलमुळे जिल्ह्याची विभागणी

द्वारकानाथ घुर्ये म्हणाले, ओसरगाव येथे टोल नाका उभारणे चुकीचे आहे. या टोल नाक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची विभागणी होत आहे. जिल्हा रुग्णालय, जिल्हा मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक जातात. त्यांना ये-जा करताना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच नांदगाव येथे लवकरच मार्केट यार्ड उभारले जाणार असून, तेथे मालवाहतूक करतानाही व्यापारी आणि शेतकऱ्यांना टोल भरावा लागेल.

हा नवा महामार्ग नाही, फक्त रुंदीकरण

अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग टोलमुक्त असेल, अशी ग्वाही दिली होती. मात्र आता वारंवार टोल सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. हा नवा महामार्ग नसून विद्यमान महामार्गाचे केवळ रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे टोल वसुली करणे चुकीचे आहे.

ना. नितेश राणेंशी चर्चा, पुढील दिशा ठरणार

टोलमुक्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवसांत पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

You cannot copy content of this page