सुदैवाने जीवितहानी टळली..
⚡कणकवली ता.१८-: शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बस स्थानकासमोर अपघात झाला. देवरुख-सावंतवाडी बस कणकवली बस स्थानकात प्रवेश करत असताना, बाजूने वागदेच्या दिशेने जाणाऱ्या हिरो कंपनीच्या डेस्टिनी मोटारसायकलला वळण घेताना बसने धडक दिली. या अपघातात सुदैवाने मोटारसायकलस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र नव्या मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक पोलीस संदेश आबिटकर तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरातील नागरिकांनीही तत्काळ मदतकार्य केले. एसटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. अथक प्रयत्नानंतर बस खाली गेलेली मोटारसायकल बाहेर काढण्यात आली.
