खड्डेमय रस्त्यामुळे शेलटी ग्रामस्थ आक्रमक…

१ मे रोजी उपोषणाचा इशारा..

⚡मालवण ता.१५-:
हडी वाकडा आंबा ते शेलटी (हडी) या गेली अनेक वर्ष खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे. अन्यथा 1 मे रोजी उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वाकडा आंबा ते शेलटी (हडी) ग्रामीण मार्ग क्र. 225 हा रस्ता शेलटी वाडी मध्ये जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हा रस्ता डोंगरातून मोठ्या घोकादायक उताराने शेलटी वाडी मध्ये जातो. गेली 20 वर्षे या रस्त्यावर शासनाचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. आम्ही शेलटी ग्रामस्थ मंडळ, शेलटी आणि शेलटी ग्रामोनती मंडळ मुंबई हा रस्ता दुरुस्त करून मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे अतोनात प्रयत्न करत आहोत. परंतु फक्त आश्वासन मिळतात प्रत्यक्षात निधी काही मिळत नाही. रस्ता एवढा खराब झालेला आहे की सध्या तिथे रस्ताच शिल्लक नाही. वाडीतील महिला लहान मुलांना शाळेतून टू व्हीलर वरून घेऊन येताना बऱ्याच अपघात होत असतात. कुठलाही रिक्षावाला या खड्डेमय रस्त्यामुळे शेलटीला भाड्याला येत नाही. आमच्या शेलटी वाडीतून गेली कमीतकमी दहा वर्षे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फक्त रस्त्याचीच मागणी करत आहोत. बाकी आम्हांला काहीच नको. ही एकच समस्या अजून पर्यंत कोण दूर करु शकत नाही. येत्या 8 दिवसात आमची रस्त्याची मागणी पुर्ण न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून आमच्या शेलटी वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला 1 मे रोजी उपोषणाला बसण्यार आहोत. अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने सुशील शेडगे यांनी दिली.

You cannot copy content of this page