वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी प्रशासनाची कारवाई..
⚡मालवण ता.१५-:
मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केट इमारत समोर भाजीपाला स्टॉल व्यवसायिकानी रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या नोटीसा मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, रचना सहाय्यक स्नेहल पाटील यांनी स्टॉल ठिकाणी जावून रस्ता व बंदिस्त गटार यांची हद्द दाखवली. त्यामागे स्टॉल न्यावेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होता नये अश्या सक्त सूचना दिल्या. यावेळी उपस्थित नगरसेवक यांनीही वाहतुकीस अडथळा ठरेल अशा प्रकारे कोणतेही स्टॉल असू नये. अन्यथा नियमानुसार कारवाई होणार असे स्पष्ट केले.
नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले होते, नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट इमारती समोर भाजीपाल्याचे स्टॉल लावले असून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तरी आपले भाजीपाल्याचे स्टॉल तात्काळ रस्त्यावरुन मागे घेवून गटारापासून आतमध्ये लावावेत. अन्यथा आपल्या विरुध्द नियमोचित प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करुन स्टॉल उचलण्यात येतील, याची दखल घ्यावी. या नोटीस प्राप्त झाल्या नंतर व्यवसायिकानी आपले भाजीपाला स्टॉल मागे घेण्याची कार्यवाही तात्काळ सुरु केली आहे.
मालवण नगरपरिषद रचना सहाय्यक, स्नेहल पाटील यांनी रस्ता व गटार यांची हद्द दाखवून देत यापुढे कोणतेही अतिक्रमण करण्यात येऊ नये याबाबत सक्त सूचना केल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक ललित चव्हाण, शेखर गाड आदी उपस्थित होते.
