कुडाळ : आजच्या संगणक युगातही महिलावर्ग सुरक्षित नाही. त्यांच्यावर अजूनही घरगुती हिंसाचार हा कमी झालेला नाही. हा हिंसाचार कमी झाला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात महिलांच्या संरक्षणासाठी काम करणारी पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यअधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी खेबुडकर यांनी पिंगुळी गुढीपुर येथे ठाकर आदिवासी विविध शासकीय योजना शिबिरात केले
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग व ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी विविध शासकीय योजना शिबीराचे आयोजन सोमवारी ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी पिंगुळी येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन श्री खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगडच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, जेष्ठ ठाकर कलाकार सुरेश रणसिंग, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा ठाकर समाज माजी अध्यक्ष भगवान रणसिंग, रामा ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक, सागर रणसिंग, निलेश रणसिंग, तृप्ती पाटील, कावेरी कासलरकर, विजय ठाकूर, निलेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, दीपक मस्के, भरत ठाकूर, चेतन गंगावणे, एकनाथ गंगावणे तसेच जिल्ह्यातील ठाकर समाजाचे पदाधिकारी विविध खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री खेबुडकर म्हणाले, आपण 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा केला करतो. पण बहुतांशी महिलांवर घराघरातही घरगुती हिंसाचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हे हिंसाचार थांबण्यासाठी सर्वांनी विशेष करून महिला वर्गाने त्या त्या भागात एकत्र येऊन काम करणे काळाची गरज आहे. समुपदेशन करून काही होणार नाही. प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. अशाप्रकारे महिलांवर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी जर सगळ्या महिला एकत्र येऊन याबाबत उठवतील तर ते खरोखर कौतुकास्पद ठरेल. याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रात महिलांचे संरक्षण करणारी पहिली जिल्हा परिषद आहे. शाखा, ऑफिस अशा अनेक ठिकाणी महिलांना अन्यायाला सामोरे जावे लागते. ते कुठेतरी थांबले पाहिजे. महिलाबाबत असणाऱ्या पारंपरिक प्रथा बंद करण्याबाबत प्रत्येक गावाने ठराव केला हे जरी खरी असले, तरी महिलांचा सन्मान होतो का? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. असे सांगत
आदिवासी उपक्रमांतर्गत शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजना या ठिकाणी पाहता आल्या अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे हे कौतुकास्पद आहे असे सांगितले
श्रीमती गलांडे म्हणाल्या कित्येक वर्षाची ठाकर लोककला आजही जोपासली गेली आहे. ही कला जोपासण्याचे काम पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या कुटुंबाने केले आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणारे जे प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. हे काम करताना सर्व विभागांना सोबत घेऊन काम करणार. कोणतेही काम करताना एकीचे बळ आवश्यक असल्याचे सांगून विविध ठाकर लोककलांनी मी मंत्रमुग्ध झाल्याचे सांगितले.
गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, ठाकर समाज हा जिल्ह्याचा अविभाज्य भाग आहे. लोककलांचा ठेवा जपणारी ठाकर आदिवासी लोककला जिल्ह्याचे भूषण आहे. समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. आटक यांनी आदिवासी समाजासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहे त्याचा लाभ अद्याप पोहोचलेला नाही असे सांगत सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न झाला पाहिजे असे सांगितले.
या शिबिरात महसुल विभागामार्फत जातीचे दाखले,आधारकार्ड कॅम्प, रेशनकार्ड नावे कमी करणे, दुरुस्ती तसेच नविन शिधापत्रिका वाटप, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड वाटप, आरोग्य तपासणी आरोग्य विषयक सेवा,आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती व त्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया आदी सुविधा समाजबांधवासाठी आहेत याबाबत शिबिर व मार्गदर्शन करण्यात आले.
ठाकर लोककलानी सोहळ्यात रंगत
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ठाकर समाजाची विविध लोककला सादर करण्यात आली. लोककला डोना गीत फुगडी, पांगुळ बैल, खूण करून नावे सांगणे आदी विविध सादरीकरणाने कलावंतांनी कला सादर करत या सोहळ्यात रंगत आणली. कित्येक वर्षाची कळसुत्री बाहुली तसेच आर्ट गॅलरीला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तेजस्विनी गलांडे व इतर अधिकारी यांनी भेट देऊन पद्मश्री पशुराम गंगावणे व त्यांच्या कुटुंबाने साकारलेल्या कलाबाबत अभिनंदन केले. सूत्रसंचालन ठाकर समाजाचे कार्याध्यक्ष प्रवीण ठाकूर यांनी केले.
