युवक गंभीर जखमी”सामाजिक बांधिलकीकडून तात्काळ मदत..
⚡सावंतवाडी, ता.१३-: कारीवडे येथील गोठण देवस्थान परिसरात काल मध्यरात्री सुमारास भीषण अपघात घडला असून संतोष गुळदवेकर (वय 23) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुळदवेकर हा एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजविण्याचे काम करतो. काल रात्री नाटक संपल्यानंतर तो माडखोल येथील आपल्या घरी मोटरसायकलने जात असताना त्याला अचानक झोप लागली. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना कळविण्यात आले असता त्यांनीही तत्काळ रुग्णालयात पोहोचून पुढील उपचारासाठी मदत केली.
प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी संतोष गुळदवेकर याला गोवा येथील बांबूळी येथे हलविण्यात आले. दरम्यान, आज सकाळी रवी जाधव यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजले.
या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर तसेच रुग्णालय कर्मचारी निलेश राऊळ यांनी केलेल्या तत्पर मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
