कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच:उपनगराध्यक्ष सुशांत नाईक..
⚡कणकवली ता.३१-: शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा सध्या निष्क्रिय झाली आहे.
यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर परिणाम होत असून, गुन्हे तपासातही अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. चोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वी शहरात घडलेल्या अनेक घटनांचा उलगडा याच कॅमेऱ्यांच्या मदतीने झाला होता.
दरम्यान, कणकवलीतील युवा शिवसैनिक तसेच बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाच्या तपासादरम्यानही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. जर ही यंत्रणा कार्यरत असती, तर तपासाला अधिक दिशा मिळाली असती, असे सुशांत नाईक म्हणाले.
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि रात्री वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सध्या ती बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही ही यंत्रणा तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
एकूणच, शहराच्या सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’ ठरलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
