शेकडो परराज्यातील पर्ससीन टॉलर्सचा समुद्रात धुमाकूळ:माशांच्या लुटीने मच्छिमार संतप्त..
⚡मालवण ता.३०-:
एलईडी लाईट पर्ससिन मासेमारीला महाराष्ट्रात बंदी असूनही मालवणच्या समुद्रात शेकडोंच्या संख्येने एलईडी लाईट पर्ससीनचा धुमाकूळ सुरू असून रात्रीच्या वेळी समुद्रात या मासेमारीचां लखलखाट किनाऱ्यावरूनच दिसून येत आहे. मात्र दुर्दैवाने एलईडी लाईट मासेमारीचा हा लखलखाट मत्स्य विभाग व मत्स्यमंत्र्यांना दिसत नाही. या अतिरेकी मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कोणततीही कारवाई होत नाही. जिल्ह्यातीलच मत्स्यमंत्री असूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच एलईडी मासेमारीचे प्रमाण अतिप्रमाणात वाढलेले आहे, मत्स्यमंत्र्यांची मच्छीमारांसाठी असलेली तळमळ ही केवळ दाखवण्यापूर्ती व बोलण्यापुरतीच दिसून येते. त्यामुळे मत्स्यमंत्र्यांच्या या दुर्लक्षामुळे सामान्य मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असे जोरदार टीका मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे.
मालवणच्या समुद्रात सात ते आठ वाव अंतरातच एलईडी लाईट पर्ससीनद्वारे अनधिकृत मासेमारी सुरु असून रात्री किनाऱ्यावरून दिसणाऱ्या या नौकांच्या प्रकाशझोताचे छायाचित्र मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी टिपून याबाबत मत्स्य विभाग व मत्स्यमंत्री यांच्यावर टिका केली आहे.
किनाऱ्यापासून काही अंतरावरील समुद्रात एलईडी पर्ससीन मासेमारी होत असताना मत्स्य विभागाचे अधिकारी सुशेगात आहेत. विद्यमान मत्स्यमंत्री हे जिल्ह्यातीलचा असूनही त्यांच्याच कार्यकाळात एलईडी मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. आजपर्यंत झालेल्या कारवाईत जास्त प्रमाण परजिल्ह्यातील नौकांचे आहे, ही बाब चांगली असली तरी स्थानिक एलईडी धारकांना यामधून वगळले जाते किंवा नौका सोडून दिल्या जातात. गेल्याच महिन्यात रत्नागिरीच्या तीन बोटी पकडल्यावर त्या वेंगुर्ला बंदरात आणल्या गेल्या त्यानंतर त्या विनाकारवाईच्या सोडल्या गेल्या. मत्स्यमंत्र्यांच्या खात्यात हे असले गोलमाल भरपूर चालू आहेत हे दुर्दैव आहे. जिल्ह्याला मत्स्यमंत्री जिल्ह्यातीलचा लाभूनही आज मच्छीमारांना मासे मिळण्याचे प्रमाण कितीतरी पटीने कमी झाले आहे. मासे कमी झाल्याने माशाचे दरही गगनाला भिडले आहेत. याचे सोयर सुतक ना मत्स्यमंत्र्यांना आहे, ना त्यांच्या खात्याला आहे. मत्स्यमंत्री फक्त गाजर देत आहेत प्रत्यक्षात कृती शून्य आहे, अशी टिका बाबी जोगी यांनी केली आहे.
मासेमारीचा हंगान संपायला फक्त दोन महिने शिल्लक असून वर्षी हंगाम चालू झाला, त्यावेळी मत्स्यमंत्री यांनी एक महिन्यात स्टीलच्या बोटी आणू असे जाहीर केले होते, पण तेही त्यांना जमले नाही. समुद्रातील मासा टिकला, शिल्लक राहिला तरच मच्छीमार व मच्छीमार वस्त्या शिल्लक राहतील. नाहीतर नुसत्या योजना घोषित करून मच्छीमारांचे पोट भरणार नाही. उद्या वाढवण बंदरासारखे किनारपट्टीला मोठे प्रकल्प आणून मच्छीमार गावे उध्वस्त केली जातील. कारण एका वाढवण बंदरात साठी ४४ गाव उध्वस्त होत आहेत. अशीच परिस्थिती संपूर्ण राज्यात मासेमारी उध्वस्त करून आणायची आहे काय की आणू पाहत आहेत, असा सवाल बाबी जोगी यांनी उपस्थित केला आहे.
