Headlines

कुडाळात ठाकरेसेनेचे अनोखे ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन…

मंदार शिरसाट यांचा पुढाकार:सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीवर उपरोधिक प्रहार..

कुडाळ ता.०१-: पेपरफुटी विरोधात कुडाळ येथे आज सकाळी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेनेने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने उपरोधात्मक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन छेडले. राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात ढकलले आहे. परीक्षा यंत्रणेचा हाच ढिसाळपणा आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी, तसेच सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहीती मंदार शिरसाट यांनी यावेळी दिली.
गांधीचौक येथे या आंदोलनात बाजारातील भाजी स्टॉलप्रमाणे एक ‘भ्रष्ट परीक्षा महामंडळ अधिकृत पेपर विक्री केंद्र’ उभारून लाऊडस्पीकरद्वारे फेरीवाल्यांच्या स्टाईलमध्ये उपरोधात्मक घोषणाबाजी करत डमी प्रश्नपत्रिकांची विक्री करण्यात आली. यावेळी नीट, एमपीएससी, आणि इतर सरकारी भरतीचे पेपर मान्सून ऑफरमध्ये लाखो रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहेत, असे प्रतिकात्मक दृश्य उभे करून तसेच सरकार विरोधात जोषणाबाजी करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख कृष्णा धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर, अतुल बंगे, पं.स.सदस्या अर्चना बंगे, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे, संजय बोभाटे, मंगेश बांदेकर, बंड्या कोरगावकर आदींसह शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

You cannot copy content of this page