Headlines

अन्नसुरक्षा शिबिरात व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन…

​सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा उपक्रम:कुडाळ येथील शिबिराला ८०० हून अधिक व्यापाऱ्यांची उपस्थिती..

⚡​कुडाळ ता.३०-: अन्न आणि औषध प्रशासनाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील अन्नसुरक्षा कायद्याची व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना नवीन कायदे व नियमांची सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये एका विशेष ‘अन्नसुरक्षा प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्ह्यातील सुमारे ८०० व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​यावेळी अन्नसुरक्षा प्रशासनाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक अभय चंदनशिवे, कु. ताजने मॅडम आणि गावित साहेब यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना कायद्यातील बदल आणि घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
​ ​शिबिरात अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना ११ महत्त्वाच्या मुद्द्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये वर्तमानपत्र किंवा छापील कागदावर यापुढे अन्नपदार्थ देता येणार नाहीत. खाद्यपदार्थांसाठी केवळ अन्नदर्जाचे पॅकेजिंग, बटर पेपर, पार्चमेंट, प्रमाणित गुंडाळी कागद किंवा सुरक्षित कंटेनरचाच वापर करावा लागेल. ग्राहकाला सुरक्षित आणि मोफत पिण्याचे पाणी पुरविणे बंधनकारक आहे. ग्राहकाला बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी विकत घेण्यास भाग पाडता येणार नाही. तसेच, व्यवसायाच्या पिण्याच्या पाण्याची दर ६ महिन्यांनी तपासणी करून स्थानिक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र दुकानात लावावे लागेल.
​ व्यवसायाच्या ठिकाणी (किचनसहित) पेस्ट कंट्रोल करून त्याचे प्रमाणपत्र आणि ‘अन्न सुरक्षा प्रमाणपत्र’ दुकानाच्या दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. याशिवाय व्यवसाय करणे हा गुन्हा ठरेल. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमितपणे ग्लोव्हज, एप्रन आणि कॅप्सचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, क्षेत्रात धुम्रपान आणि थुंकण्यास सक्त मनाई आहे. अन्न हाताळणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
​ फ्रिजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी शिजवलेले किंवा कच्चे अन्नपदार्थ वेगळ्या आणि स्वतंत्र कप्प्यात ठेवावे लागतील. एक्सपायरी (मुदतबाह्य) झालेल्या वस्तू अस्थापनेत न ठेवता, त्यावर स्वतंत्र लेबल लावून एका बॉक्समध्ये वेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर बंदी: एकदा वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. तसेच, ते तेल नाल्यात किंवा उघड्यावर टाकणे हा देखील गुन्हा आहे.

​दुकानाच्या दर्शनी भागात ‘ही’ ५ प्रमाणपत्रे लावणे आवश्यक:

​१. अन्नसुरक्षा प्रमाणपत्र (FSSAI License)
२. प्रशिक्षण प्रमाणपत्र (Training Certificate)
३. कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र
४. पिण्याच्या पाण्याचा तपासणी दाखला
५. पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र

​ या महत्त्वपूर्ण शिबिराला महासंघाचे कार्यवाह राजू जठार, कोषाध्यक्ष ॲड. नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष अवधुत शिरसाट, दिपक भोगले, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, सहकार्यवाह राजन नाईक, माजी अध्यक्ष नितिन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, प्रकाश वाळके, कुडाळ तालुका अध्यक्ष पी.डी.शिरसाट आणि संजय भोगटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
​ हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुका अध्यक्ष पी.डी.शिरसाट, राजन नाईक आणि महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. नियम न पाळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले.

You cannot copy content of this page