जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार:नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही..
⚡कणकवली ता.३०-: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील जुने भाजी मार्केट इमारतीचा काही भाग मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आधीच जीर्ण झालेल्या इमारतीचा भाग कोसळल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाला दिली. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत कोसळलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, जुने भाजी मार्केटची संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपले आहे. आज इमारतीचा काही भाग कोसळल्याने संभाव्य धोका अधिक स्पष्ट झाला आहे. या इमारतीत सध्या काही व्यापारी व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ते पुढे म्हणाले, या इमारतीची केवळ डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही. सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबा दुखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिड्ये, भगवान कासले, संगीता जयताळकर, एजाज काझी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाणे, लक्ष्मण महाडिक, सहिद नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपुत, महेश मेस्त्री, निलेश निखार्गे आदी उपस्थित होते.
