⚡बांदा ता.३०-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा सटमटवाडी येथे बंद पडलेल्या पथदिव्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गोवा राज्याच्या सीमेपासून बांदा पोलीस तपासणी नाक्यापर्यंतच्या दुभाजकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न लावून धरला होता.
याबाबत प्रशासनाने दखल घेत आज आवश्यक विद्युत जोडणीचे काम पूर्ण केले असून, आजपासून या मार्गावरील पथदिवे पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्गावरील अंधाराचे साम्राज्य दूर होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा परिसर हा अत्यंत वर्दळीचा आणि अपघातप्रवण भाग मानला जातो. पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वेगवान वाहने, अवजड ट्रक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येबाबत मनसेने आवाज उठवत तात्काळ पथदिवे सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून विद्युत जोडणी पूर्ण केल्याने आजपासून सर्व पथदिवे कार्यान्वित होणार आहेत. मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगत तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर मनसे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो:-
बांदा सटमटवाडी येथे पथदिव्यांची विद्युत जोडणी करताना महावितरणचे कर्मचारी. सोबत तालुकाप्रमुख मिलिंद सावंत.
मनसेच्या पाठपुराव्याला यश; बांदा सटमटवाडीतील बंद पथदिवे पुन्हा सुरू…
