रुपेश पावसकर :चार महिन्यांपूर्वी लक्ष वेधून सुद्धा प्रशासन ढिम्म,प्रशासन,ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला..
⚡कुडाळ ता.३०-: मतदारसंघातील बेकायदेशीर माती आणि दगड उत्खननाबाबत मी चार महिन्यांपूर्वीच (२९ एप्रिल २०२६ रोजी) तहसीलदारांना लेखी पत्र देऊन आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्याची मागणी केली होती. हे उत्खनन लोकांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. पण प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आणि काल तिथे भलामोठा दगड कोसळण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी अजूनही तिथे धोकादायक दगड आणि मातीचा ढिगारा तसाच आहे. या निष्पाप नागरिकांच्या जीवाच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी आता प्रशासनाने घेतली नाहीतर येथे माळीणसारखी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट बघतेय का, असा संतप्त सवाल जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रशासकीय अनागोंदी आणि कंत्राटदारांच्या मनमानीवर बोट ठेवत त्यांनी अनेक खळबळजनक गोष्टींकडे लक्ष वेधले.
रुपेश पावसकर यांनी पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले काही दिवसांपूर्वी आम्हाला न विचारता कंत्राटदाराने बेकायदेशीर उत्खनन सुरू केले होते. मी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून तलाठ्यांना घटनास्थळी पाठवले. तिथे जेसीबी जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आला. मात्र, नंतर आतून काय ‘गोलमाल’ झाला कुणास ठाऊक, तो जेसीबी पुन्हा सोडून देण्यात आला. जेव्हा मी खारलँड कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला, तेव्हा मला अत्यंत धक्कादायक उत्तर मिळाली. अधिकारी म्हणाले की, ‘तो कंत्राटदार खूप मोठा माणूस आहे, तो राष्ट्रीय राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या देतो. त्यामुळे आमचे हात तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तो करेल तेव्हाच काम होईल.’ अधिकाऱ्यांची ही लाचार भूमिका अत्यंत निंदनीय असल्याचे रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे.
पावसकर यांनी पुढे सांगितले की, संबंधित कंत्राटदाराला बंदराच्या कामासाठी माती टाकण्याची परवानगी दिली गेली होती. परंतु, नियमांचे उल्लंघन करत त्यांनी बंदराऐवजी थेट स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये माती आणून टाकली. या बेजबाबदार कृत्यामुळे आज अनेक शेतकरी त्यांच्या हक्काच्या शेतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.
नदीकिनाऱ्यापासून संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे वाळू आणि माती उपशामुळे संपूर्ण परिसराला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने २०२५ मध्येच या संदर्भात ठराव घेऊन जमीन सुरक्षिततेबाबत पावले उचलण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करूनही यंत्रणा ढिम्म आहे. एका जिल्हा परिषद सदस्याच्या पत्राला जर प्रशासन केराची टोपली दाखवत असेल, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? मी जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी आता गप्प बसणार नाही, तीव्र संघर्ष करू, असा इशारा श्री. पावसकर यांनी दिला आहे.
कालच्या घटनेनंतर सध्या दुर्घटनास्थळी अशी परिस्थिती आहे की तिथे कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा साधे जेसीबी किंवा कोणतेही वाहनही पोहोचू शकत नाही, इतकी दुरवस्था झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी रुपेश पावसकर यांनी केली आहे.
दरम्यान रुपेश पावसकर यांनी कुडाळ तालुक्यातील काही घटनांनकडे सुद्धा लक्ष वेधले. चेंदवण येथे ग्राम पंचायतीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची नादुरुस्त बोट ठेवली होती. तर त्यासाठी कुडाळ तहसीलदार यांनी चेंदवण सरपंच आणि ग्रामसेवक याना नोटीस काढली. खरंतर त्या बोटीची दुरुस्तीचा खरंच ग्राम पंचायतीने करायचा नसतो, तो खर्च महसूल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाने करायचा असतो तरी देखील तहसीलदारांनी नोटीस काढून वेठीस धरण्याचा प्रकार केला. दुसऱ्या एका घटनेत वालावल-बंगेवाडी येथे निलेश अनंत बंगे म्हणून ग्रामस्थ आहेत, त्यांना कुडाळ तहसीलदारांनी सांगितले कि डोंगर खचला आहे, तुम्ही स्थलांतरित व्हा. पण त्यांची राहायची आणि जेवणाची व्यवस्था कोणी करायची ? असा सवाल उपस्थित करून श्री. पावसकर यांनी तहसीलदार ग्रामस्थांना धमकी देत असल्याचा आरोप केला.
दरम्यान वालावल-मूर्तळीवाडी येथे उत्खनन करणारा प्रकाश मेंगाडे म्हणून जो ठेकेदार आहे त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे श्री. पावसकर यांनी सांगितले. कारण उत्खननामुळे लोकांची घरेदारे उध्वस्त होणार आहेत. तसेच ज्या महसूलच्या अधिकाऱ्यांनी साटेलोटे केलेले आहे त्यांच्या विरोधात एसीपीकडे तक्रार करणार असल्याचे श्री. पावसकर म्हणाले. अनिर्बंध उत्खननामुळे लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे यावर प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. न पाहिल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला आहे.
