Headlines

तळवडे बाजारपेठेतील इस्त्री दुकानास आग…

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक विजय कुंभार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला. या दुर्घटनेत सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गणपती उत्सवासाठी माल खरेदी करण्यासाठी जमवून ठेवलेली सुमारे २ लाख रुपयांची रोकडही आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.

विजय कुंभार हे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत इस्त्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नीच्या आजारपणासह अनेक संकटांचा सामना करत त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधनच उद्ध्वस्त झाले आहे. सोमवारी सकाळी दुकानावर आल्यानंतर दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत दुकानातील इस्त्रीसाठी आलेले कपडे, विविध वस्तू, फर्निचर व इतर साहित्य पूर्णपणे जळून गेले होते. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आवश्यक कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कुंभार यांनी पैशांची जमवाजमव केली होती. मात्र, रात्रीच्या आगीने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. व्यवसायातील सुमारे ६ लाखांचे साहित्य आणि जमवून ठेवलेली २ लाखांची रोकड जळाल्याने कुंभार कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. सुदैवाने दुकानालगत असलेल्या इतर दुकानांना आगीचा फटका बसला नाही. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीची माहिती मिळताच तळवडे बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुंभार कुटुंबीयांना दुकानाबाहेर काढण्यासाठी तसेच आग विझविण्यासाठी त्यांनी मदत केली. मात्र, दुकानातील बहुतांश साहित्य आगीत जळून खाक झाले होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर कुंभार कुटुंबावर आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असून, व्यापारी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page