शिष्यवृत्तीधारकांचा अनोखा गुणगौरव:शिवसेना-युवासेना आणि पं. स. सदस्य योगेश धुरी यांचा अभिनव उपक्रम..
⚡कुडाळ ता.१७-: तालुक्यातील माणगाव–नांनेली परिसरातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट त्यांच्या घरी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला.
‘आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन सूर्यकांत धुरी याने जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. तसेच वैष्णवी न्हानू गावडे, मिताली मिलिंद धुरी, स्वरा शिवराम काणेकर, शुभ्रा महेश भिसे आणि प्रथम रवीसंदेश बांदेलकर यांनीही चमकदार कामगिरी करत शिष्यवृत्ती मिळविली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.
या कौतुक सोहळ्याप्रसंगी माणगावचे उपसरपंच बापू बागवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अवधूत गायचोर, काजल नाईक, ईश्वरी सावंत, शिवसेना उपविभाग प्रमुख शैलेश विर्नोडकर आणि युवासेना विभाग संघटक सचिन तेली आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी थेट घरी येऊन आपल्या मुलांचा गौरव करीत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच बळ मिळेल, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
