जिल्हाप्रमुख संजू परब: आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
⚡सावंतवाडी ता.३०-: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ शिक्षणावरच अवलंबून न राहता, त्यासोबत इतर क्षेत्रातील कला व कौशल्य आत्मसात केले पाहिजे. परीक्षेत भरपूर टक्केवारी मिळवली म्हणजे आयुष्याचे कल्याण झाले असे होत नाही, त्यामुळे पालकांनी मुलांची आवड ओळखून त्यांना त्यांचे आवडते क्षेत्र निवडण्याची मुभा दिली पाहिजे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे केले.
आमदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी हे विचार मांडले.
या प्रसंगी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हा प्रमुख नीता कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक अजय गोंदावळे, अशोक दळवी, आबा केसरकर, पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, प्रणाली टिळवे, परिक्षित मांजरेकर, गुरु मठकर, राकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संजू परब पुढे म्हणाले, आपल्याकडची मुले शिक्षणामध्ये नेहमीच उजवी राहिली आहे परंतु पुढे जाऊन कुठेतरी ती कमी पडत आहे पालक वर्ग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी न देता त्यांच्या मनाविरुद्ध क्षेत्रात जाण्यासाठी हट्ट करतात अशावेळी सदरची मुले त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही परिणामी अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ त्या विद्यार्थ्यावर येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना आवडते क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी, यापलीकडेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे जो विद्यार्थी व्यसनापासून दूर राहिला तो विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी झाला असे समजा.
यावेळी बोलताना पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळाने आयोजित केलेला हा गुणगौरव सोहळा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी या उपक्रमाचे गौरवद्गार काढले. अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते, असेही त्या म्हणाल्या.
सोहळ्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि नीता कविटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन करत यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सावंतवाडी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
