Headlines

इन्सुली घाटातील धोकादायक झाडे हटविण्यास सुरुवात…

नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश..

⚡बांदा ता.०१-: इन्सुली घाटातील धोकादायक झाडे हटविण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, आज घाट परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली घाटातील अनेक मोठी झाडे रस्त्याकडे झुकल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही धोकादायक झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनाची दखल घेत संबंधित यंत्रणांनी आज झाडे तोडण्याची मोहीम सुरू केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करत सूचना दिल्यात. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुहास ठाकूर आणि सुनील सावंत उपस्थित होते.
यावेळी श्री राऊळ यांनी पावसाळ्यात इन्सुली घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि अवजड वाहतूक होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उर्वरित धोकादायक झाडेही तातडीने हटवावीत, अशी मागणी संबंधित विभागाकडे केली. तसेच भविष्यात अशा धोकादायक झाडांची नियमित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या कारवाईमुळे इन्सुली घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page