देवगडमध्ये संरक्षक भिंत व सुशोभीकरण प्रकल्पाला सुरुवात; १ कोटींचा निधी मंजूर…

⚡देवगड, ता.३०-: पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांच्या पाठपुराव्यामुळे देवगडमधील विठ्ठलवाडी पोकळे नाका ते किल्ला दत्त मंदिर या मार्गाच्या विकासाला गती मिळाली आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीअंतर्गत या मार्गावर संरक्षक भिंत उभारणे व सुशोभीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील ४० लाख ८१ हजार २५ रुपयांच्या कामाचे भूमिपूजन रविवारी ज्येष्ठ नागरिक प्रदीप पारकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

सदर मार्ग अरुंद असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. याच कारणामुळे देवगड किल्ला परिसरापर्यंत जाणारी एसटी बस सेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र आता संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित व रुंद होणार असून वाहतुकीसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा रस्ता मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसराचे सुशोभीकरण होऊन पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भूमिपूजन प्रसंगी स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, रवी गिरकर, राजू कावले, भाऊ पारकर,महेंद्र पारकर, नीरज पोकळे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी दोन्ही टप्प्यांत एकूण १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, देवगडच्या विकासासाठी आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page