Headlines

आज सीड बाॅल… उद्या हिरवाईचा महासागर…

घारपी जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

⚡बांदा ता.३०-: १ जुलै ‘कृषी दिन’ हा केवळ शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करणारा दिवस नाही, तर माती, शेती, निसर्ग आणि पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी आहे. आधुनिक कृषीक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सीड बॉल निर्मिती’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मुले मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात अधिक रमू लागली आहेत. अशा काळात मातीशी त्यांचे नाते पुन्हा जोडणे, निसर्गाची ओळख करून देणे आणि पर्यावरण जपण्याची जबाबदारी त्यांच्या मनात रुजवणे, ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी माती, शेणखत आणि विविध देशी वृक्षांच्या बियांचा वापर करून शेकडो सीड बॉल तयार केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना चालू वर्षी उन्हाळी सुट्टीत बिया संकलन करण्याचे आवाहन या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बियांचे संकलनही केले होते.
सीड बॉल म्हणजे केवळ मातीचा गोळा नव्हे; तो भविष्यातील एका वृक्षाचा जन्म आहे. पावसाळ्यात हे सीड बॉल डोंगरउतार, मोकळ्या जागा आणि वनक्षेत्रात टाकल्यानंतर पावसाच्या पाण्यामुळे त्यातून नैसर्गिकरीत्या रोपे उगवतात. कमी खर्चात आणि सहजपणे वृक्षसंवर्धन घडवून आणण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, मातीचे संवर्धन, जलसंधारण, जैवविविधता, हवामान बदल आणि वृक्षांचे जीवनातील स्थान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. “माती जपली तर शेती टिकेल, शेती टिकली तर जीवन फुलेल,” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला.
सीड बॉल तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, मातीशी जुळलेले त्यांचे नाते आणि प्रत्येक बियाला जपून ठेवण्याची त्यांची तळमळ पाहून उपस्थितांनाही समाधान वाटले. आज या चिमुकल्यांनी तयार केलेले सीड बॉल उद्या हजारो झाडांचे रूप घेतील, पक्ष्यांना निवारा देतील, पावसाला आमंत्रण देतील आणि पुढील पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करतील, हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्याध्यापक जे. डी. पाटील व सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता, शेतीबद्दल आदर आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
आज पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी राहिलेली नाही; ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्याची सुरुवात शाळेपासून आणि विद्यार्थ्यांपासून झाली, तर भविष्यात हरित, समृद्ध आणि शाश्वत भारत घडविण्याचे स्वप्न निश्चितच साकार होईल.
घारपी शाळेने कृषी दिनाच्या निमित्ताने राबविलेला ‘सीड बॉल’ उपक्रम हा केवळ एक शालेय कार्यक्रम नसून, मातीवर प्रेम करणारी, शेतीचा सन्मान करणारी आणि निसर्ग जपणारी भावी पिढी घडविण्याचा एक प्रेरणादायी संस्कार सोहळा ठरला.
“आज चिमुकल्या हातांनी पेरलेली बीजे… उद्या महाराष्ट्राला हिरवाईची नवी ओळख देतील.”

You cannot copy content of this page