दररोज २० लाख लिटर पाणीपुरवठा सुरूच – नगराध्यक्ष संदेश पारकर..
⚡कणकवली ता.३०-: शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, कणकवली नगरपंचायतीच्या नळ योजनेद्वारे दररोज सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा नियमितपणे केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असला तरी शहरात कोणतीही भीषण पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.
कणकवली नगरपंचायतीत माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. पारकर म्हणाले, उन्हाळ्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नळ योजना सक्षम पद्धतीने चालवण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे. पाणीटंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, शिवडाव धरणाचे पाणी १ एप्रिलपासून गड नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. हे पाणी गडनदी पात्रामार्गे सुमारे आठ दिवसांत कणकवलीतील गडनदीवरील जॅकवेलपर्यंत पोहोचणार असून, त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व मुबलक प्रमाणात सुरू राहणार आहे.
उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी नैसर्गिक कारणांमुळे कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बाष्पीभवन, तसेच पाणी जमिनीत झिरपणे या प्रक्रिया दरवर्षी होत असल्याने नदीपात्र काही प्रमाणात कोरडे पडते, मात्र यामुळे पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय जलसंपदा विभाग आणि कणकवली नगरपंचायत यांच्यात पाणी आरक्षणाचा करार झालेला असून, त्याअंतर्गत दरवर्षी १२ लाख रुपये पाणीपट्टी भरली जाते. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी अमोल चोपडे, पद्माकर पाटील व श्री. माणगावकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही नगराध्यक्ष पारकर यांनी दिली.
