⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धेची कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सरस्वती धोंडी सावंत असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवळीये गावातील मधलीवाडीत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज सायंकाळी पाचच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. यावेळी संशयित बाप लेकाने सरस्वती सावंत यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा एकनाथ सावंत याने पोलिसांना पाचारण केले.
जखमी सरस्वती सावंत यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ ओवळीये येथे धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एकाच वाडीतील संशयित आरोपी बाप-लेकांना ताब्यात घेतले आहे. विजय कृष्णा सावंत(६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. जमिनीच्या जुन्या वादातूनच हा टोकाचा संताप अनावर होऊन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या भीषण हत्याकांडाने शांत असलेल्या ओवळीये गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
