वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा:सुशांत दळवी खून प्रकरण तापले..
कणकवली : सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत पोलिसी तपासाविषयी साशंकता निर्माण होत आहे. पोलीस अद्याप या घटनेविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. वास्तविक सुशांत यांना दोन महिन्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने धमकी दिली होती. याबाबत सुशांत यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करावा. अन्यथा वेळ काढल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांनी दिला.
विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक व उपरकर बोलत होते. यावेळी उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी सचिन सावंत, राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, सुशांत दळवी खून प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याविषयी माहिती देण्यास पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तपासासाठी कणकवलीत येऊन गेले. मग तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, याची माहिती पोलीस का देत नाहीत? सुशांत दळवी हे आमच्या शिवसेना पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे नाईक म्हणाले.
उपरकर म्हणाले, या खून प्रकरणाबाबत जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या खूनाला मायनिंग वादाचे, बिल्डिंग वादाचे कारण आहे, अशा चर्चा आता सुरू झाल्यात. आम्ही पोलीस तपासामध्ये बिलकुल अडथळा करत नाही. मात्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नसेल तर वेळप्रसंगी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असे उपरकर म्हणाले.
