Headlines

आखातातील युद्धाचा मच्छिमारांना फटका ; डिझेल पुरवठ्याचे दर वाढल्याने मच्छिमार अडचणीत…

⚡मालवण ता.२०-:
इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता भारतातील मासेमारी व्यवसायावर होत असून मच्छिमार सहकारी संस्थाना देण्यात येणाऱ्या डिझेल पुरवठ्याचे दर अचानक वाढविण्यात आल्याने मच्छिमार संस्था व मच्छिमार अडचणीत आले आहेत. पेट्रोल पंपावर ९५ रुपये दराने मिळणारे डिझेल मच्छिमार संस्थांना ११५ रुपये दराने विक्री केले जात आहे, यामुळे मच्छिमारी व्यवसायास मोठा आर्थिक फटका बसत असून हि स्थिती अशीच राहिल्यास युद्धामुळे जसे औद्योगिक गॅस सिलेंडर बंद करण्यात आले तसे मच्छिमारांना डिझेल पुरवठा बंद केला गेल्यास मच्छिमारी बंद होण्याची व मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर यांनी व्यक्त करत याबाबत पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून डिझेल दरवाढीबाबत मच्छिमारांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

गेली अनेक वर्ष मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाकडून देण्यात येणारा डिझेल परतावा अनियमित स्वरूपात मिळत होता. मात्र, डिझेल परतावा नियमित मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केले. मात्र, सध्या आखाती देशांमध्ये इराण विरुद्ध अमेरिका व इस्त्रायल यांच्या युद्धामुळे तेलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या युद्धाचा फटका आता येथील मच्छीमारांनाही बसत आहे. मच्छीमार संस्थांना होणारा डिझेल पुरवठा हा ९२ ते ९५ रुपये दराने होत होता. मात्र, युद्धामुळे मच्छीमार संस्थाना होणारा डिझेल पुरवठा हा ११५ रुपये दराने होत असून २० ते २२ रुपयांची वाढ झाली आहे. मच्छीमार व्यवसायासाठी डिझेल पुरवठा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून त्यावरच सर्व मत्स्यव्यवसाय अवलंबून आहे. मात्र ज्या पद्धतीने युद्धामुळे औद्योगिक गॅस सिलेंडर देणे बंद केले गेले व घरगुती सिलेंडर वरील दर वाढविण्यात आला त्याचप्रमाणे मच्छीमारी व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलवर आणखी दर वाढविला गेल्यास मच्छिमार मोठ्या अडचणीत येण्याची भीती आहे. तसेच युद्ध असेच सुरू राहिल्यास भविष्यात मच्छीमारीसाठी डिझेल पुरवठा बंद केला गेल्यास मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होऊन मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल व यामध्ये मच्छीमार होरपळला जाईल, असे विकी चोपडेकर यांनी म्हटले आहे

त्यामुळे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जातीनिशी लक्ष घालावे, अशी मागणी विकी चोपडेकर यांनी केली आहे. मच्छीमारांना होणाऱ्या डिझेल पुरवठ्याचे दर कमी होण्यासाठी तसेच भविष्यात दर आणखी वाढू नये यासाठी ना. राणे यांनी प्रयत्न करावेत, असे विकी चोपडेकर यांनी म्हटले आहे. एकीकडे मच्छिमारी कमी होत असताना मच्छिमारी वाढीसाठी शासन विविध योजना राबवत आहे, मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी मच्छिमार जिवंत राहिला पाहिजे, डिझेल पुरवठ्याचे दर वाढते राहिल्यास अथवा डिझेल पुरवठा बंद झाल्यास मच्छिमार जिवंत राहणार नाही, त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे व शासनाने याप्रश्नी लक्ष घालून मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विकी चोपडेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page