Headlines

नादुरुस्त एसटी बसांची तातडीने दुरुस्ती करा…

बांदा–बोरिवली बस पुन्हा सुरू करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी: जावेद खतीब यांनी निवेदन केले सादर..

⚡बांदा ता.०९-: सावंतवाडी आगारातून ग्रामीण भागात धावणाऱ्या नादुरुस्त एसटी बसेस तातडीने दुरुस्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध करावी, तसेच प्रवासी भारमान असूनही बंद करण्यात आलेली बांदा–बोरिवली एसटी बस पुन्हा सुरू करावी, या मागण्यांसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सहायक वाहतूक अधीक्षक गौतमी कुबडे यांना आज निवेदन देण्यात आले. तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा उशारा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी आगारातील अनेक एसटी बसेस अत्यंत नादुरुस्त अवस्थेत धावत आहेत. पावसाळ्यात बसच्या छतामधून पाणी गळत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक बसमधील वायपर कार्यरत नसणे, वाहनातील जॅक, टॉमी, व्हील पाना, स्पेअर टायर व अग्निशामक यंत्रणा अपूर्ण किंवा निकामी असणे, सामान ठेवण्याची जागा अस्वच्छ असणे, चालकासमोरील काचा फुटलेल्या अवस्थेत असणे तसेच हेडलाईट योग्य प्रकारे कार्यरत नसल्याने मुसळधार पावसात वाहन चालविताना चालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत आहे.
तसेच कर्मचारी व वाहनांची कमतरता ही कारणे पुढे करून अनेक गाड्या नियोजित वेळेत सोडल्या जात नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या बसमधून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो ग्रामस्थ प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नादुरुस्त बसेस तातडीने सेवेतून बाजूला काढून त्यांची दुरुस्ती अथवा बदली करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रवासी भारमान असूनही बंद करण्यात आलेली बांदा–बोरिवली एसटी बस तात्काळ सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली. अन्यथा पुढील आठ दिवसांत योग्य तोडगा न निघाल्यास प्रवाशांच्या हितासाठी तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, बांदा मंडल सदस्य संदीप बांदेकर, बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, तालुका सरचिटणीस स्वप्नील राऊळ, युवा मोर्चा सदस्य विनायक झाट्ये, तालुका उपाध्यक्ष सुहास राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती कुबडे यांनी माहिती घेत नादुरुस्त बस तात्काळ आगारात बोलावून घेतली. तसेच बांदा बोरिवली बस तात्काळ सुरु करण्याबाबत कर्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
फोटो:-
सावंतवाडी येथे गौतमी कुबडे यांना निवेदन देताना बांदा भाजपचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page