उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र:वैभववाडी तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याचा विश्वास..
⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील २८ एकर उपलब्ध शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या निवेदनात नाधवडे येथील शासकीय मालकीची २८ एकर जमीन औद्योगिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले आहे. या ठिकाणी एमआयडीसीची स्थापना झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. तसेच स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अजूनही मोठी क्षमता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नाधवडे परिसरातील उपलब्ध शासकीय जमीन, दळणवळणाच्या सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता या ठिकाणी नवीन एमआयडीसी विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होण्यासही मदत होईल, असे मंत्री ना. राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील २८ एकर शासकीय जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंती देखील मंत्री नितेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
