कलाकारांसाठी साडेचार कोटींचे पॅकेज: दत्ता सामंत यांची माहिती..
⚡मालवण ता.०९-:
सिंधुदुर्गाची अस्मिता असलेल्या दशावतार, भजन आणि कीर्तन कलाकारांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे हे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. काल त्यांनी विधिमंडळात हा विषय लावून धरल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी कलाकारांसाठी वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच कलाकारांना ओळखपत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्थानिक पातळीवर शिबिरे घेऊन नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याचे मान्य केले असून यामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंवीत असलेला दशावतारी कलाकारांचा प्रश्न आमदार निलेश राणे यांच्यामुळे मार्गी लागल्याची माहिती शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील महायुतीच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका शर्वरी पाटकर, देवेंद्र नाईक, राजा सामंत, भाऊ मोरजे, राजू बिडये, भाई मांजरेकर, सूर्यकांत पालव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८६ पारंपरिक दशावतार कंपन्या असून अडीच ते तीन हजार कलाकार आहेत. तसेच भजनी कलाकारांची संख्या १५ ते २० हजारांच्या घरात आहे. शासनाचा सध्याचा प्रतिवर्षी १०० लोकांचा मानधनाचा कोटा अत्यंत तोकडा आहे. हा कोटा किमान तीन पटीने वाढवावा, यासाठी आम्ही माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्र्यांकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच ५० पेक्षा जास्त प्रयोग करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना अ दर्जा देऊन मानधनात प्राधान्य मिळावे, अशी आमची मागणी आहे असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
