Headlines

निराधार योजनांतील ऑनलाइन हयात दाखल्याची अट शिथिल करा…

अशोक दळवी गजानन नाटेकर यांची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर..

⚡सावंतवाडी, ता.०९-: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी हयात दाखला ऑनलाइन सादर करण्याची सक्ती शिथिल करावी, अशी मागणी सावंतवाडी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष अशोक दळवी व गजानन नाटेकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने या योजनांतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयात दाखला सादर करणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी बँक व्यवस्थापकांच्या दाखल्यावर हा दाखला ग्राह्य धरला जात होता. मात्र सन २०२६ पासून ऑनलाइन पद्धतीने हयात दाखला सादर करण्याची अट लागू करण्यात आली असून त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत निश्चित करण्यात आली होती.
निवेदनात म्हटले आहे की, या योजनांतील बहुतांश लाभार्थी वृद्ध, दिव्यांग व दुर्गम भागात राहणारे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भाग, वारंवार खंडित होणारी इंटरनेट सेवा आणि प्रतिकूल हवामानामुळे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. तसेच विविध शासकीय सेवांसाठी सर्व्हर वारंवार बंद राहत असल्याने लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यामुळे पूर्वीप्रमाणे बँक व्यवस्थापकांच्या सहीचा हयात दाखला ग्राह्य धरावा आणि ऑनलाइन पद्धतीची सक्ती शिथिल करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी माजी सदस्य नारायण लक्ष्मण राणे, विनोद सुखदेव सावंत, संदेश महादेव सोनुळेकर, भटक्या विमुक्त समाज शिवसेनेचे अध्यक्ष संजय विठ्ठल गावडे, माजी सरपंच उमेश मधुकर गावकर, विभागप्रमुख महेश भानुदास सावंत तसेच उपतालुकाप्रमुख रोकेश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page