बांधावरच शाळा भरवत विविध शेतीकामांचा घेतला अनुभव
सावंतवाडी : ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नांगरणी, तरवा काढणी, भात लावणीसह विविध शेतीकामांचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव आणि कृषी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्धल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने “बळीराजासाठी एक दिवस” हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जातो. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी वेत्ये-गावडेवाडी येथील बाबली गावडे यांच्या शेतात जात शेतीचे धडे घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरविली. शिक्षक व पालक यांनी मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ती कशी चालवावीत याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी तरवा काढणे, तरव्याची पेंडी बांधणे, ट्रॅक्टर चालवणे, मेर लावणे, लावणी करणे, दाता चालवणे आदी सर्व प्रात्यक्षिके दाखविली. मुलांनी व मुलींनी प्रत्यक्ष शेतात उतरून तरवा काढणी, भात लावणी आदी शेतीच्या कामांचा मनमुराद आनंद लुटला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, सदस्य महेश गावडे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. बाबली गावडे तसेच शाळेच्या महिला पालकांनीही मदत केली. यामुळे बळीराजाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देता आला. बाबली गावडे यांनी सर्वांना वेफर्स व चहाचे वाटप केले.
