Headlines

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला सामाजिक उपक्रमांची रेलचेल…

⚡कणकवली ता.०९-: कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा नगराध्यक्ष झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस १४ जुलै २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी आणि विकास कामांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षवाटप, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांमध्ये कणकवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष श्री. नाईक बोलत होते. यावेळी नगरसेवक लुकेश कांबळे, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, संतोष पुजारे, दिवाकर मुरकर, निकीत मुरकर आदी उपस्थित होते.

पुढे श्री. नाईक म्हणाले, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेली २० वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्याच कार्याचा वारसा कायम ठेवत यंदाचाही वाढदिवस कोणत्याही दिखाऊ स्वरूपाऐवजी समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१४ जुलै रोजी शहरात एक हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे ५०० रक्तदात्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, माजी उपसरपंच सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच दहावी, बारावी व विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १३ जुलै रोजी एचपीसीएल हॉल येथे होणार असून, चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम त्याच ठिकाणी पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उड्डाणपूला खलील परिसराच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम, गणपती सान्याच्या परिसरातील सुशोभीकरण तसेच इतर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेत नगरपंचायतीच्या गेल्या सहा महिन्यांतील काम – काजाचाही आढावा घेण्यात आला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व सुंदर कणकवली तसेच आधुनिक कणकवलीचा संकल्प घेऊन अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, मोकाट जनावरांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांपैकी सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नमो उद्यानासह विविध विकासकामे पूर्णत्वास जात असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांचा हा पहिलाच वाढदिवस कणकवलीकरांनी उत्सवासारखा साजरा करावा, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page