डॉ. मोहन दहीकर :कुडाळ मध्ये अंमली पदार्थ जनजागृती अभियान पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण,वेदांत महाजन आणि अथर्व तावडे आपापल्या गटातून विजेते..
⚡कुडाळ ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे हे जरी खरे असले तरी वाईट मार्गावर जाणाऱ्याला योग्य मार्गावर आणता येते. त्यासाठीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सारखे कार्यक्रम पोलीस विभागाकडून घेतले जातात. या वाईट प्रवृत्ती विरोधात सर्वानी एकत्र येऊया युवा पिढीला व्यसनांपासून वाचवूया असे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी केले. कुडाळ येथे आज अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत पोस्टर स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत लहान गटातून वेदांत महाजन याने तर मोठ्या गटातून अथर्व तावडे याने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी डॉ. रुपेश धुरी आणि पत्रकार शेखर सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आज अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत पोस्टर स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, डॉ. रुपेश धुरी, पत्रकार शेखर सामंत, पोस्टर स्पर्धेचे परीक्षक कला शिक्षक समीर चांदेरकर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. रुपेश धुरी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
त्यापूर्वी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्या पोस्टर्सचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी मांडण्यात आले होते. त्याची पाहणी सर्व मान्यवरांनी केली. तसेच यानिमित्ताने बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी काढलेल्या व्यसन मुक्तीचा संदेश देणाऱ्या रांगोळीचे सुद्धा पोलीस अधीक्षक डॉ. दहीकर यांनी कौतुक केले.
हि पोस्टर मेकिंग स्पर्धा सातवी ते दहावी आणि अकरावी-बारावी अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेविषयी परीक्षक समीर चांदेरकर यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल – गट क्र. 1 (इयत्ता 7 वी ते 10 वी ) गटात प्रथम – वेंदात संतोष महाजन (माध्यमिक विद्यामंदिर,आचरा), द्वितीय – भक्ती संदिप सुतार (ए.व्ही. फडणीस, घोणसरी), तृतीय – मृणाल महेश पाटील (विद्यामंदिर, कणकवली), उत्तेजनार्थ – लौकीक भालचंद्र मेस्त्री (पनामा हायस्कुल, तेंडोली) व मृणाली प्रशांत कासार (न्यु इंग्लीश स्कुल, ओरोस).
गट क्र.2 (इयत्ता- 11 वी, 12 वी ) प्रथम – अथर्व गणेश तावडे (न्यु इंग्लीश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा), द्वितीय – वैभवी जीवन कुडाळकर (कुडाळ हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज कुडाळ), तृतीय – दुर्वा निलेश धुरी (शिवराज मराठा माध्य, व उच्च माध्य. विद्यालय, साळगांव), उत्तेजनार्थ – जयराम रामचंद्र सोनार (डॉन बॉस्को स्कुल, ओरोस) व रिया फणसोपकर (श्रीराम माध्यमिक विद्यामंदीर, पडेल).
यावेळी डॉ. रुपेश धुरी अत्यंत सोप्या पद्धतीने, प्रसंगी आरसा दाखवत, संवाद साधात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार शेखर सामंत यांनी देखील विद्यार्थ्यंशी संवाद साधला. अंमली पदार्थांच्या विळख्यात सिंधुदुर्गातील तरुण पिढी सापडते कि काय अशी भीती श्री. सामंत यांनी व्यक्त केली. अंमली पदार्थांचा वापर केवळ सेवनापुरताच राहिला नसून तरुणाईला आता खुलेआम त्याच्या व्यापारामध्ये अडकवले जात असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले. त्यामुळे या तरुणांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा समाजाने घ्यावी असे आवाहन केले.
डॉ. दहिकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पोलिसांना मित्र माना. अशा प्रकारच्या काही चुकीच्या घडामोडी घडत असल्यास पोलिसांना माहिती द्या. अंमली पदार्थांपासून दूर राहा. नैराश्य, भीती, असुक्षितता वाटत असेल तर पालक, मित्र, शिक्षक यांच्या पाशी मन मोकळे करा, असे आवाहन डॉ. दहीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कोल्हे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत डॉ. मोहन दहीकर, प्रवीण कोल्हे, राजेंद्र मगदूम, जयदीप पाटील आदींनी केले. यावेळी साईनाथ जळवी, डॉ. स्मिता सुरवसे, श्री. साळवी सर, अजित व्हनमाने सर, राजेंद्र मगदूम, जयदीप पाटील, भीमसेन गायकवाड आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेज, कुडाळ कॉलेजचे विद्यार्थी, पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.
