प्रशासनाचे आवाहन ; आडेली कामळेवीर झाराप नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेविर कार्यक्षेत्रात शासनातर्फे विस्तीर्ण धरण कार्यान्वित आहे. आडेली लघु पाटबंधारे प्रकल्प (ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग) येथील धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणुन धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. पाणीसाठ्यावर नियंत्रित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ९ वा. आवश्यकतेनुसार सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
सदर विसर्गामुळे धरणाच्या खालच्या बाजूस ओढा पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित गावातील सर्वच नागरिकांनी, शेतकरी, मासेमारी करणारे युवक, तसेच पात्रात व परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. ओढापात्र, पूल, बंधारे तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या परिसरात अनावश्यक वावर करू नये. नदीपात्रात जनावरे सोडणे, मासेमारी करणे, कपडे धुणे, इत्यादीसाठी नदीकाठावर जाऊ देऊ नये. कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर ग्रामपंचायतींनी याबाबतची जाहीर सूचना दवंडी, ध्वनिक्षेपक व इतर उपलब्ध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आडेली, कामळेवीर, झाराप गावातील नागरिकांनी विशेष दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल-कुडाळ कार्यकारी अभियंता एस. एच. महाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना माहिती न देता सदर काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी शासनाने तातडीने लक्ष पुरवावे, याबाबतीत लक्ष वेधले होते. त्यानतर आज गुरुवारी सकाळीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडेली कामळेवीर धरण येथे भेट देऊन प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान आडेली कामळेविर झाराप तसेच नजीकच्या गावात नदीतुन या पाण्याचा विसर्ग होणार असल्याने याबाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी,असे यावेळी पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी बोलताना स्पष्ट केले. यावेळी अधिकारी, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, स्थानिक ग्रामस्थ गंगाधर गोवेकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
