१,०५० नमुन्यांपैकी ९० दूषित; जलव्यवस्थापन समितीत संताप, तातडीने प्रशिक्षणाचे आदेश
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ :
जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याच्या यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत उघड झाले. जिल्ह्यातील तब्बल ६० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि पाणी नमुने संकलित करण्याचे प्रशिक्षणच नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सचिव शीतल पुंड, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, सभापती प्रितेश राऊळ, संतोष साटविलकर, संहिता तांबे, मनोज रावराणे, सुप्रिया वालावलकर, सुनील पारकर, केशव नारकर, आरती पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जून महिन्यातील पाणी तपासणीचा अहवाल सादर करताना १ हजार ५० पाणी नमुन्यांपैकी ९० नमुने दूषित आढळल्याची माहिती दिली. त्यामध्ये ग्रामीण भागातील ८६ आणि शहरी भागातील चार नमुन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कुडाळ शहरातील तपासण्यात आलेले सर्व नमुने दूषित आढळले, तर दोडामार्ग तालुक्यातील एकही नमुना दूषित नव्हता.
यावेळी सदस्य मनोज रावराणे यांनी पाणी नमुने संकलनाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नसल्यामुळे प्रथम पाणी शुद्ध करून त्यानंतरच नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे प्रत्यक्ष दूषित पाण्याचे वास्तव दडपले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना डॉ. धुरी यांनी प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यशाळेला केवळ ४० टक्के कर्मचारी उपस्थित राहिल्याचे सांगितले. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांनी पाणी नमुने घेताना ग्रामपंचायत कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी संयुक्तपणे काम करावे, जेणेकरून नमुना संकलन योग्य पद्धतीने होईल आणि दूषित पाणीपुरवठा टाळता येईल, अशी सूचना केली.
बैठकीत आगामी पाणीटंचाईवरही चर्चा झाली. ऑगस्टमध्ये पाणीटंचाई आराखडा तयार करून डिसेंबरपर्यंत मंजुरी व कामाचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वेळेत नियोजन पूर्ण करावे, असे निर्देश दिले. तसेच स्वच्छता व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचे पाच महिन्यांपासून प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चौकट : ५० मिनिटे अधिकाऱ्यांची प्रतीक्षा
बैठक सकाळी ११ वाजता नियोजित असतानाही अध्यक्ष, पदाधिकारी आणि समिती सचिव उशिराने सभागृहात पोहोचल्याने प्रत्यक्ष कामकाजाला तब्बल ११.५० वाजता सुरुवात झाली. त्यामुळे वेळेवर उपस्थित असलेल्या विविध विभागांच्या अधिकारी व खातेप्रमुखांना जवळपास ५० मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. बैठकीच्या वेळेच्या नियोजनाबाबतही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झाले.
