Headlines

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांकडून २५-३० हजारांची वसुली…?

स्थायी समितीत मनोज रावराणे यांचा गंभीर आरोप..

⚡ओरोस ता ८-: सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात, असा गंभीर आरोप करीत मनोज रावराणे यांनी हे नियमात आहे का ? नियमात नसेल तर संबंधितांवर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न बुधवारी झालेल्या स्थायी समितीत उपस्थित केला. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी अधिष्ठाता यांच्या समवेत बैठक घेऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल, असे सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी स्थायी समिती सभा संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष तुकाराम साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक डॉ उदय पाटील, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, सदस्य संदेश सावंत, मनोज रावराणे, संदीप गावडे, रुपेश कानडे, सुमेधा पाताडे, सुप्रिया वालावलकर, सोनाली घाडीगावकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सदस्य रावराणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून पैसे घेतले जातात. २५ ते ३० हजार रुपये रुग्णांना भरण्यासाठी सक्ती केली जाते. याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असा गंभीर आरोप केला. तसेच पैसे घेणे नियमात नसेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष कामत यांनी शुक्रवार १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता आपल्या दालनात अधिष्ठाता यांना बोलावून घेऊन याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. तसेच अन्य काही तक्रारी असल्यास त्याबाबत सुद्धा चर्चा करून विषय सोडविले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे हा विषय थांबला.

You cannot copy content of this page