योगा-मेडिटेशन सेंटर, ‘खाऊ गल्ली’ व क्रीडा कामांसाठी निधी केसरकरांच्या माध्यमातून मंजूर…

भाजप पदाधिकाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये : बाबू कुडतरकर यांचा टोला..

⚡सावंतवाडी, ता. २०-: नरेंद्र डोंगर येथे प्रस्तावित योगा व मेडिटेशन सेंटर तसेच ‘खाऊ गल्ली’ प्रकल्पांना आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कामांचे फुकट श्रेय घेऊ नये, असा टोला शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी लगावला.

कुडतरकर पुढे म्हणाले की, भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांचा उल्लेख केला तरी आमची हरकत नाही; मात्र संबंधित प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यात आमदार दीपक केसरकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे किमान त्यांचे नाव घेणे अपेक्षित होते.
तसेच जिमखाना मैदानावरील ड्रेसिंग रूम दुरुस्ती व क्रीडा संकुलासाठीही केसरकर यांनी निधी मंजूर करून आणला आहे. मात्र काही भाजप पदाधिकारी ही कामे आपणच केल्याचा आव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हा प्रकार नागरिकांची दिशाभूल करणारा असून प्रत्यक्षात सर्व कामे स्थानिक आमदारांच्या माध्यमातूनच मंजूर होत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडावी आणि नाहक श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच, “केसरकरांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः नवीन प्रकल्प आणण्याची घोषणा करा. निधी मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करू,” असा टोला देखील कुडतरकर यांनी लगावला.

You cannot copy content of this page