संबंधित विभाग व ठेकेदार कामाबाबत करताहेत टाळाटाळ:ग्रामस्थांचा आरोप;अर्धवट रस्त्याच्या कामामुळे येथील ग्रामस्थांना सहन करावा लागतोय त्रास..
⚡सावंतवाडी ता.२७-: तळवणे येथील मुख्य रस्ता ते झंजीरवाडी हरिजन वाडी रस्ता (४०० मीटर) दोन वर्ष होत आली तरी अपूर्णावस्थेत असून,याबाबत संबंधित विभाग व ठेकेदार या कामाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.तसेच या रस्त्याच्या पुढे भटवाडी ही वाडी असून येथील ग्रामस्थांना सुद्धा या अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे प्रवास करणे धोक्याचे असून, एखादी दुर्घटना घडली तरच या विभागाला जाग येणार काय?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे शासन ग्रामीण भागातील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विविध येजनामार्फत प्रयत्न करत असून,मात्र तळवणे येथील संबंधित रस्ता हा खडीकरण डांबरीकरण होण्याच्या प्रतीक्षेतच आहे.गेले दोन वर्ष सदरील झंजीरवाडी हरिजनवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक ३५६ या ४०० मीटर रस्त्याच्या कामाबाबत मंजुरी मिळाली होती.सदरचे काम ठेकेदार यांना देऊनही या रस्त्याचे काम अधांतरीतच असल्याचे दिसून येत आहे.
या कामांबाबत वारंवार येथील लोक प्रतिनिधी , ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना,ठेकेदारांना विचारणा केली.मात्र आज करतो,उद्या करतो हेच उत्तर त्यांच्या कडून मिळत असल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक होताना दिसताहेत.सदरील रस्त्यावरून भाटवडीतील व,स्थानिक ग्रामस्थ रात्री बेरात्री कामानिमित्त ये जा करत असतात त्यात करून एखादा प्रसंग ओढवला तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिगरीचेच असल्याने हा प्रवास करणे खडतरच आहे.
संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत हे काम करून ठेवल्याने येथील ग्रामस्थांना प्रवास करणे म्हणजे डोक्याला तापच असून,बांधकाम विभागाने हे प्रलंबित असलेले अर्धवट काम लवकरात लवकर सुरू करून लोकांना होणारा त्रास कमी करावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे,जर हे काम लवकरात लवकर सुरू नाही केल्यास ग्रामस्थ आक्रमक होत रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले.
या रस्त्याच्या कामाबाबत येथील ग्रामस्थ,जमीन मालक सहकार्य करून सुद्धा सदरील काम सुरू होण्यास दोन वर्ष कालावधी लागतो आणि ही काम पूर्णपणे अर्धवट स्थितीत ठेवण्याचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येते.
मात्र संबंधित काम हे आज होईल ,उद्या होईल या आशेवर येथील ग्रामस्थांनी सहन केलं. या नंतर मात्र गप्प बसणार नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितलं.
