बांदा देऊळवाडी–मुस्लिमवाडी भरड येथे भीषण आग…

पाच एकर काजू बागायती जळून खाक, लाखोंचे नुकसान..

⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील देऊळवाडी व मुस्लिमवाडी भरड परिसरात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाल्याची घटना घडली. काजू हंगाम तोंडावर असतानाच बागायतींचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
आज दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागलेले ठिकाण वस्तीपासून काही अंतरावर असल्याने सुरुवातीला ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही. दुपारची वेळ, कोरडे वातावरण आणि वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. बागायती परिसरात मोठ्या प्रमाणात सुकलेला पालापाचोळा व गवत असल्याने ज्वाळा झपाट्याने पसरत गेल्या.
घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सावंतवाडी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर व नगरसेवक संजू परब यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन बंबाची मागणी केली. मात्र नगरपरिषदेचा बंब उपलब्ध न झाल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्त प्रयत्नांतून आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आग लागलेल्या माळरानाच्या लगत दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेत आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिक, युवक आणि ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असतानाही अनेक युवकांनी उपवासाच्या अवस्थेत आग विझविण्यासाठी पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडवले.
या आगीत नीलेश मोरजकर, राजन मोरजकर, राजा सावंत, प्रमिला मोरजकर व श्री सावळ यांच्या काजू बागायती पूर्णतः जळून खाक झाल्या. तसेच सागवान व जांभूळ यांसारखी झाडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काजू हंगामाच्या अगोदरच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनास्थळी बांदा तलाठी फिरोज खान, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच आबा धारगळकर, हर्षद कामत, शैलेश केसरकर, सुशांत पांगम, भय्या गोवेकर, ज्ञानेश्वर येडवे, बाबू चव्हाण, समीर आगा यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणाच्या जवळच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. सुदैवाने आग त्या भागापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
फोटो:-
बांदा – देऊळवाडी भरडावर लागलेल्या आगीत काजू बागायती जळून खाक झाली.
फोटो:-
अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविताना नागरिक व जवान (छायाचित्र : निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page