वेंगुर्ला कॅम्प येथे 100 खाटांचे “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” बाबत न. प. विशेष सभेत ठराव मंजूर…

श्री. दिलीप गिरप :
मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नागरिकांना घरपट्टीत सूट..

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील जागेमध्ये ( (नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह नजिक ) या ठिकाणी 100 खाटांचे “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ” उभारण्याबाबतचा ठराव उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.तसेच आज विशेषतः मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील नागरिकांना घरपट्टीत सूट देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, असा ठराव नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी मांडला व त्यास मंजुरी देण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हा महत्वपूर्ण ठराव मांडला.
वेंगुर्ला नगरपालिकेचा सन २०२६ – २७ या आर्थिक वर्षाचा ११२ कोटी १३ लाख २४ हजार ३६४ रुपये रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात ९६ कोटी ४८ लाख ४२ हजार 400 रकमेचा अंदाजित खर्च, यामुळे १५ कोटी ६४ लाख ८१ हजार ९६४ रकमेच्या शिल्लकीचा अर्थसंकल्‍प महाराष्‍ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०१ अन्‍वये सर्वानुमते मंजूर करण्‍यात आला, याबाबतची घोषणा
नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आजच्या विशेष सभेत केली. वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी नगराध्‍यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्‍या अध्‍यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्‍न झाली.
यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, रवींद्र शिरसाट, संदेश निकम, युवराज जाधव, सुधीर पालयेकर, दाजी परब, प्रशांत आपटे, सदानंद गिरप, सचिन शेट्ये, विनय नेरुरकर, नगरसेविका रिया केरकर, आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल, सुमन निकम, तसेच लेखापाल अभिषेक पाटील, सभा अधीक्षक स्नेहल शिंदे, नगर अभियंता विशाल होडावडेकर, रचना सहाय्यक अक्षय तोरसकर, कोमल पावसकर आदी उपस्थित होते. या अर्थसंकल्पात वेंगुर्ला पर्यटन महोत्‍सव, शतकोत्‍तर सुवर्ण महोत्‍सवी कार्यक्रम, भटक्‍या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, महिला बालविकास कल्‍याणकारी कार्यक्रम, दिव्‍यांग कल्‍याणकारी योजना, मागासवर्गीय कल्‍याणकारी योजना, खेळांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी क्रीडा स्‍पर्धा, आरोग्‍य विषयक कार्यक्रम, पर्यावरण पूरक पिशव्‍या, सफाई कर्मचा-यांसाठी आरोग्‍य विमा, गटारे व नाले साफसफाई, कौशल्य विकास कार्यक्रम, ई गव्हर्नन्स, ई- ऑफिस, अभिलेख स्कॅनींग, ई चार्जिंग स्‍टेशन उभारणी, सौर उर्जा प्रकल्‍प उभारणी, कला, क्रीडा व सांस्कृतिक इमारती उभारणी, नमोउदयान, नारायण तलाव विकसन, वनराई बंधारे अर्थसहाय्य, घरकुले बांधकामे तसेच शहर विकासासाठी अनेक महत्‍वपूर्ण तरतूदी करण्‍यात आलेल्‍या आहेत. यावेळी सर्वप्रथम नगरसेवक संदेश निकम यांनी 27 फेब्रुवारी रोजी केंद्रशासनाने मराठी भाषा दिन निमित्त मराठी भाषेस अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील मांडवी भागात पर्यटनदृष्ट्या फ्लोटिंग रिसॉर्ट साठी 5 कोटी निधी मंजूर झाला असून येथील पर्यटन वाढीसाठी हा प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे, असे मत यावेळी नगरसेवक संदेश निकम यांनी सभागृहात मांडले.याबाबत सध्या शहरातील काही उंच भागात भागात पाण्याची समस्या असून येथील नारायण तलावाचे पुनरुजजीवन होणे आवश्यक आहे. वेळीच मंजूर निधी खर्च न झाल्यास निधी परत जाऊ नये यादृष्टीने व पाण्याच्या प्रश्नास प्रथम प्राधान्य देऊन हा निधी नारायण तलावासाठी / पुनःरुजजीवनसाठी वापरण्यात यावा, असा नगराध्यक्ष यांच्यासह सर्वानुमते ठराव घेण्यात आला.
अमली पदार्थ मुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात :
” वेंगुर्ला शहरात अमली पदार्थांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात एकूण सात ते आठ स्पॉट निर्माण झाले आहेत. अगदी आठवी इयत्तेपासूनची मुले, कॉलेज विद्यार्थी शहरात सायंकाळी अमली पदार्थांचा वापर करतात – गांजा ओढतात, ही बाब नगरसेवक प्रीतम सावंत यांनी सभागृहात उपस्थित केली. याबाबत वेंगुर्ला सारख्या शांत शहरात अमली पदार्थ येतो कुठून, याबाबत माहिती घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी करावी, संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष पुरवून कार्यवाही न केल्यास पोलीस स्थानकास धडक देण्यात येईल, असा इशारा प्रीतम सावंत यांनी सभागृहात दिला .कंपोस्ट डेपोच्या नजिकच्या एका स्पॉटवर मुले जमतात, असा दुजोरा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनीही दिला. आज तरुणवर्ग अमली पदार्थच्या व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला आहे. त्यामुळे शहरासाठी व विद्यार्थी – पालक यांच्यासाठी ही बाब गंभीर असून नगराध्यक्ष यांनी त्वरित लक्ष पुरवून कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी ही विशेष सभा असूनही सभा प्रभाविपणे हाताळली. विशेष सभेत अर्थसंकल्प सह सर्व विषय मंजूर करण्यात आले.

You cannot copy content of this page