कणकवली – वैभववाडीत मोबाईल व्हॅन लोकअदालत…

न्याय थेट जनतेच्या दारी’ संकल्पना साकार..

⚡कणकवली ता.२७-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग–ओरोस तसेच तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली व वैभववाडी तालुक्यात दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोबाईल व्हॅन लोकअदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शुभम गोविंद लटूरिया, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कणकवली तथा दिवाणी न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत न्यायसेवा पोहोचवणे, कायद्याविषयी जनजागृती करणे आणि तळागाळातील नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देणे हा होता.

विविध गावांत जनजागृती

या कालावधीत जिल्हा परिषद शाळा, हरकुळ खुर्द, ग्रामपंचायत तळेरे, ग्रामपंचायत सांगुळवाडी व ग्रामपंचायत भिरवंडे येथे मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिरे घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायत भिरवंडे व ग्रामन्यायालय, वैभववाडी येथे मोबाईल व्हॅन लोकअदालत पार पडली. या शिबिरांत कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, महिलांचे व बालकांचे हक्क, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि मोफत विधी साहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लोकअदालतीत अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून नागरिकांना जलद, सुलभ व खर्चिक टाळणारा न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला.

विधीज्ञांचे मार्गदर्शन

या उपक्रमात विधीज्ञ श्री. एम. एम. सावंत, श्री. पी. पी. रावराणे, श्री. प्रताप सुतार, अजितसिंह काळे, श्रीमती जी. डी. मालवणकर, श्रीमती पी. पी. मांजरेकर, रेखा सावंत व स्वाती तेली यांनी अभ्यासपूर्ण व लोकाभिमुख मार्गदर्शन केले.

न्यायालयीन कर्मचारी वर्गातील सौ. एम. एम., श्री. एस. व्ही. सावंत व श्री. पी. डी. सावंत यांनीही नियोजनबद्ध कामकाज करून कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

“न्यायालयाच्या चार भिंतींपलीकडे न्याय”

या उपक्रमाविषयी बोलताना शुभम लटूरिया म्हणाले, “न्याय हा केवळ न्यायालयाच्या चार भिंतींत मर्यादित न राहता तो थेट जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. मोबाईल व्हॅन लोकअदालत व जनजागृती शिबिरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण होतो, त्यांना स्वतःचे हक्क व कर्तव्ये समजतात आणि वादाऐवजी समेटाचा मार्ग स्वीकारला जातो. या उपक्रमामुळे कणकवली व वैभववाडी तालुक्यात “न्याय सर्वांसाठी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page