सावंतवाडी–दोडामार्गातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह घोषित झाल्याने पर्यावरण चळवळीचे मोठे यश…

डॉ. जयेंद्र परुळेकर:वृक्षतोडीवर तात्काळ लगाम लावण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी, ता.२७-: केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला मोठे यश मिळाले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी जैवविविधतेने नटलेल्या या परिसराचे संरक्षण या निर्णयामुळे अधिक सक्षम होईल, अशी आशा डॉ. जयेंद्र परुळेकर व संदीप सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान न्यायालयीन लढा देणाऱ्या वनशक्ती फाउंडेशन या संस्थेचे पंचवीस गावांतील ग्रामस्थ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सावंतवाडी तालुक्यातील तेरा गावे आणि संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडबंदी लागू असतानाही काही ठिकाणी बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केसरी, फणसवडे, सरमळे, कोलझर, फुकेरी आदी गावांमध्ये शेकडो एकर क्षेत्रावर वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले असून, हा प्रकार न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले. याबाबत न्यायालयाच्या अवमानासंदर्भात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.अलीकडेच आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील वाढती वृक्षतोड आणि वन्यजीव–मानव संघर्षाचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करत वन विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडीतील तेरा गावांमध्ये वृक्षतोडबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही समिती केवळ कागदोपत्रीच राहिल्याची खंत व्यक्त करण्यात आली. समितीने प्रभावीपणे कार्य केले असते तर एवढ्या प्रमाणात वृक्षतोड झाली नसती, असे मत व्यक्त करण्यात आले.दरम्यान, या पंचवीस गावांना इको सेन्सिटिव्ह दर्जा मिळाल्याने प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग या भागातून जाण्याची शक्यता कमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.यापुढे सह्याद्री पायथ्याशी असलेल्या इतर गावांनाही इको सेन्सिटिव्ह निर्बंध लागू व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.अशी माहिती ही डॉ. जयेंद्र परुळेकर व संदीप सावंत यांनी दिली.

You cannot copy content of this page