अँड.अनिल निरवडेकर:सावंतवाडी नगरपरिषदेचा १४९.९७ कोटींचा अर्थसंकल्प केला सादर..
⚡सावंतवाडी, ता.२७-: शहरातील विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. निविदेतील अटींनुसार दर्जेदार काम न झाल्यास संबंधित ठेकेदारांचे पूर्ण बिल रोखण्यात येईल, असा ठाम इशारा सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दिला.
सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे १४९ कोटी ९७ लाख २७ हजार ८७३ रुपयांचा अर्थसंकल्प आज त्यांनी सभागृहात सादर केला. अर्थसंकल्पीय सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
५६ कोटींची शिल्लक; मूलभूत सुविधांवर भर
सादर अर्थसंकल्पात सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांची अखेरची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता या मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शहराच्या पर्यटन विकासासाठी हेल्थ फार्म तसेच शिल्पग्राम, मेडिटेशन व योगा सेंटरसाठीही तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील ५८ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत असून २०११ पासून रखडलेल्या भुयारी गटार योजनेचा विषय पुन्हा मार्गी लावण्यात आला आहे. या योजनेचे विकेंद्रीकरण करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
भटक्या कुत्र्यांवर २५ लाखांची तरतूद
शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या ९५२ कुत्र्यांचे सर्वेक्षण सुरू असून पुढील १५ दिवसांत स्वतंत्र ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून निर्बीजीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली धुरीकरण यंत्रे तातडीने दुरुस्त करून पुढील ८ ते १० दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विकासाची ‘पोचपावती’ कृतीतून
भारतीय जनता पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून त्या संधीचे सोने करून येत्या पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासाची ‘पोचपावती’ जनतेला कृतीतून देणार असल्याचा विश्वास निरवडेकर यांनी व्यक्त केला.
सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिमखाना मैदान, खेळपट्टी व घनकचरा प्रकल्प गतीने राबवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. ऑनलाइन उपस्थितीच्या मुद्द्यावर काही काळ चर्चा झाली असली तरी कायदेशीर प्रक्रियेनुसार कामकाज पूर्ण करण्यात आले.
या बैठकीस सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
