संजू परब: प्रभारी नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा केला प्रयत्न..
सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर विविध मुद्द्यांवर सवालांची सरबत्ती करत अर्थसंकल्पाच्या बजेटवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अर्थसंकल्पातील काही तरतुदी व प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नसल्याचा आरोप करत परब आक्रमक झाले. “सावंतवाडीचा अर्थसंकल्प म्हणजे खेळणं आहे का?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. जवळपास एक तास चाललेल्या आपल्या भाषणात परब यांनी विकासकामे, निधी वितरण, अपूर्ण योजना आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रभारी नगराध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी यावेळी प्रभारी नगराध्यक्ष व प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांचे योग्य निरसन करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, भुवारी गटार योजनेसाठी निधीची तरतूद व्हावी, यासाठी सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन प्रयत्न करावेत, असा प्रस्तावही परब यांनी मांडला. या मुद्द्यावर सभागृहात एकमताने सहमती दर्शवण्यात आली.सभागृहात सर्वानुमते ठराव घेण्यात आल्यानंतर प्रभारी नगराध्यक्षांनी सर्व सदस्यांचे, विशेषतः संजू परब यांचे अभिनंदन केले.
