मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले निर्देश: प्रवीण भोसले यांच्या पाठपुराला यश..
⚡सावंतवाडी, ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील इतर नगरपरिषदांप्रमाणेच सावंतवाडी नगरपरिषदेतही संबंधित निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले. रत्नागिरी नगरपरिषद तसेच राज्यातील इतर ठिकाणी ज्या पद्धतीने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यात आली, त्याच धर्तीवर सावंतवाडीतही निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी मंत्रालय, मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय मांडला. यावेळी मा. आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला. या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना दि. २४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ८.२ नुसार सफाई कामगारांची पदे व्यपगत होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी देण्याचा मार्ग खुला झाला आहे. तसेच दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी आयुक्त तथा संचालक कार्यालयाकडून यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करण्यात आल्याने कोणताही संभ्रम राहिलेला नाही.
या प्रसंगी माजी आमदार राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार रमेश कदम, कामगार नेते संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांचे वारस गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब व नितीन सदानंद कदम हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. संबंधित निर्णयामुळे नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या गोरगरीब सफाई कामगारांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या वारसांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
