नगराध्यक्षा श्रद्धा भोसले:शहराच्या विकासासाठी कटिबद्ध..
⚡सावंतवाडी, ता.२४-: सावंतवाडी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. या सभेला आपण ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची पूर्वसूचना मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली होती; मात्र सभेदरम्यान काही नगरसेवकांनी आपल्या ऑनलाइन सहभागाला विरोध करणे अयोग्य असल्याचे मत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या सध्या मी प्रसूतीमुळे रजेवर असून, महिनाभरापूर्वी रजेवर जाताना शहराच्या विकासकामांबाबत सक्रिय राहण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. “मी आजारपणासाठी नव्हे, तर मातृत्वाच्या कारणास्तव रजेवर आहे. तरीदेखील शहराच्या प्रगतीसंदर्भातील कामकाजाची माहिती ऑनलाइन माध्यमातून घेत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता मुंबईहून झूमद्वारे बैठकीला उपस्थित राहिले. मात्र काही सदस्यांनी माझ्या सहभागाला आक्षेप घेतला,” परंतु हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले,रजेवर असलेल्या नगराध्यक्षांना ऑनलाइन बैठकीत सहभागी होता येत नाही, असा कोणताही नियम अस्तित्वात नसल्याचे आपल्या माहितीनुसार स्पष्ट करत, लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून शहराच्या कामकाजाची माहिती घेणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“कोरोना महामारीनंतर ऑनलाइन बैठका ही सामान्य बाब झाली आहे. अनेक मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकारी ऑनलाइन बैठकींना उपस्थित राहतात. मग सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात अशा प्रकारे विरोध करणे योग्य नाही. हे शहराच्या संस्कृतीला व महिला सन्मानाला धरून नाही,” असेही त्यांनी म्हटले.आपल्याला ऑनलाइन बैठकीपासून वंचित ठेवण्यात आल्याने व त्याबाबत माध्यमांशी चर्चा झाल्यानेच आपली भूमिका स्पष्ट करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. “सावंतवाडी शहराच्या जनतेने मला प्रथम नागरिक म्हणून निवडून दिले आहे. शहराचा सर्वांगीण विकास, मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ व सुंदर सावंतवाडी, पर्यटनवाढ, आरोग्य व रोजगाराभिमुख प्रकल्प, क्रीडा उपक्रम तसेच युवक व महिलांसाठी रोजगारनिर्मिती या बाबींवर माझा भर राहील. सावंतवाडीला आदर्श पर्यटन शहर म्हणून जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
