दुबई येथील कार्यक्रमात मंत्र्यांची उपस्थिती:प्रादेशिक हवाई जोडणीला बळ..
⚡कुडाळ ता.२४-: यूएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत दुबई वर्ल्ड सेंट्रल (DWC) येथे भारतीय प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय९१ ने दोन नवीन ATR 72-600 विमाने आपल्या ताफ्यात अधिकृतरित्या दाखल केली आहेत.
ही दोनही विमाने दुबई एरॉसपास एंटरप्राइज (DAE) कडून खरेदी करण्यात आली असून, ती भारतातील टायर २ आणि टायर ३ शहरांना जोडण्यासाठी वापरली जाणार आहेत. ATR 72-600 हे इंधन बचतीत अत्यंत कार्यक्षम, विश्वासार्ह आणि प्रादेशिक मार्गांसाठी विशेषतः उपयुक्त मानले जाणारे अत्याधुनिक टर्बोप्रॉप विमान आहे. कमी खर्चात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याची त्याची क्षमता विशेष उल्लेखनीय आहे.
या समारंभात बोलताना शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांनी भारत आणि युएई यांच्यातील ऐतिहासिक व दृढ संबंधांचा उल्लेख केला. व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि मानवी देवाणघेवाण यांमधील मजबूत भागीदारी अधिक बळकट होत असून, विमानवाहतूक हा या नात्याचा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि नवोपक्रमांच्या जोरावर यूएईने जागतिक विमानवाहतूक क्षेत्रात आपले अग्रस्थान मजबूत केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फ्लाय९१च्या दीर्घकालीन धोरणानुसार, देशातील उदयोन्मुख आणि लहान शहरांना शाश्वत, परवडणारी व सर्वसमावेशक हवाई जोडणी उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा ठाम भर आहे. या माध्यमातून प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करत आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे.
मार्च २०२४ मध्ये कार्यारंभ केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत फ्लाय९१ ने सहा विमानांचा ताफा उभारला आहे. पुढील पाच वर्षांत ३० विमानांसह ५० हून अधिक शहरांना जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून देशाच्या आर्थिक समावेशनाला चालना देत नव्या शहरांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न आहे.
“दुबईमध्ये आमच्या ताफ्यात दोन नवीन विमानांचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. जागतिक दर्जाच्या विमानवाहतूक पायाभूत सुविधा, सेवा आणि भागीदारीसाठी ओळखले जाणारे दुबई हे शहर या दृष्टीने आदर्श मानले जाते. हा महत्त्वपूर्ण टप्पा भारतातील सर्वात विश्वासार्ह प्रादेशिक विमानसेवा उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो, तसेच यूएईतील अग्रगण्य संस्थांबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करतो,” असे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, फ्लाय९१, मनोज चाको म्हणाले.
या सोहळ्यामुळे भारत-यूएई सहकार्याच्या नव्या पर्वाची नोंद झाली असून, प्रादेशिक हवाई सेवांच्या विस्ताराला आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
