माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये घोटगे ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय गौरव…

⚡दोडामार्ग,ता.२४-: दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत राज्यस्तरावर २५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. वरळी, मुंबई येथे आयोजित समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
‘हरित गाव’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करत वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त अभियान, पावसाचे पाणी साठवण, सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन असे विविध उपक्रम राबवण्यात आले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे घोटगेने पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श उभा केला आहे.
सरपंच भक्ती दळवी यांनी हा सन्मान संपूर्ण गावकऱ्यांचा असल्याचे सांगत मिळालेला निधी पुढील हरित व पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या यशाबद्दल विविध मान्यवरांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page