बांदा शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखा निषेध..
⚡बांदा ता.२४-: बांदा शहरातील अंतर्गत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था लक्ष वेधून घेत असताना, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. बांदा पत्रादेवी रस्त्यावर काळसेवाडी येथे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे सध्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उघडी पडलेली खडी आणि सिमेंट रस्त्याचा अचानक संपणारा भाग यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या धोकादायक स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रस्त्यालगत बॅनर लावला असून त्यावर, “आपण चंद्रावर प्रवास करत आहात… जरा सांभाळून, रस्ता हरवला आहे… प्रशासन गाढ झोपेत आहे…” असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे.
दररोज या मार्गावरून मालवाहू वाहने, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. विशेषतः सिमेंट काँक्रीट रस्ता संपून खड्डेमय भाग सुरू होतो त्या ठिकाणी वाहनांना अचानक धक्का बसतो. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते.
स्थानिकांच्या मते, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपरोधिक बॅनर लावून आपला रोष व्यक्त केला आहे. परिसरात घरे, दुकाने तसेच शैक्षणिक संस्था असल्याने पादचाऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघात घडण्यापूर्वीच प्रशासन जागे होईल का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
