बांदा/प्रतिनिधी
तेरेखोल नदीत वाफोली–इन्सुली सीमेवरील रूमडाची कोंड येथे मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाफोली येथील समीर शिरोडकर यांच्या मालकीचा बैल नदीकाठी चरण्यासाठी नेण्यात आला होता. त्यावेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला चढवत बैलाच्या पायाचा लचका तोडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली.
बैल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेरेखोल नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने या घटनेची दखल घेऊन संबंधित भागात पाहणी करावी तसेच नागरिकांनी नदीकाठी जनावरे नेताना वावरताना खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सायंकाळी उशिरा वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.
तेरेखोल नदीत मगरीचा हल्ला; वाफोलीतील बैल गंभीर जखमी…
