नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन:महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ..
⚡कणकवली ता.२३-: शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. महाउत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात उत्सवामुळे भक्तिमय व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्ष पारकर म्हणाले, कणकवलीच्या जडणघडणीत महापुरुष मित्रमंडळाचे मोठे योगदान आहे. शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. येत्या पाच वर्षांत कणकवलीचा सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय असून शहरवासीयांनी तसेच विविध मंडळांनी सहकार्य करावे. शिमगोत्सवातील मांडावरील स्पर्धा असो वा अन्य उपक्रम, मंडळ सातत्याने शहराच्या वैभवात भर घालत आहे.
यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, माजी अध्यक्ष राजू सापळे, राजू मानकर, सौरभ पारकर, नीलम सावंत – पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
राजन तेली यांनी सांगितले की, नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार कार्यक्रम राबविण्यात मंडळ यशस्वी ठरत आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी नाट्यगृह, गार्डन उभारण्याचा मानस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहराला लाभलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सुशांत नाईक म्हणाले, महापुरुष मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम हा सदस्य घरचा समजून यशस्वी करतात. हरिनाम सप्ताहातील दिंडी, शिमगोत्सवातील मांडावरील स्पर्धा हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. कै. चंदू सापळे, कै. राजाराम उर्फ भाई मुंज, कै. तात्या उचले यांच्या पावलावर पाऊल ठेवत या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. आगामी काळात समाजोपयोगी उपक्रमांना माझे संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी मान्यवरांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले तर आभार विलास कोरगावकर यांनी मानले.
फोटो –
महापुरुष महाउत्सव आयोजित व्वा वुमनिया कार्यक्रमाचा शुभारंभ करताना नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सोबत नगरसेवक नगरसेविका व मंडळाचे पदाधिकारी (छाया अनिकेत उचले )
