⚡बांदा ता.२३-: बांदा येथील काळसेवाडी परिसरात भर दुपारी बंद घर फोडल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना आज घडली. शिरोडकर यांचे घर हे हमरस्त्याला लागून आहे.
आज आठवडा बाजाराचा दिवस असतानाही चोरट्यांनी ही धाडसी कारवाई केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सिद्धेश शिरोडकर यांचे बांदा बाजारपेठेत कपड्याचे दुकान असून, दुपारी जेवणासाठी ते घरी आले असता मुख्य दरवाज्याची कडी व कुलूप तोडलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बांदा पोलिसांना घरफोडीची माहिती दिली असून पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आठवडा बाजाराच्या दिवशीच भर दुपारी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भर दुपारी बंद घर फोडले; बांदा काळसेवाडीत खळबळ…
